
वाढदिवसाचा खर्च टाळून तहसील कार्यालयाला ४२ महापुरुषांच्या प्रतिमा भेट
अमळनेर (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले जगदीश पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आगळा-वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. वाढदिवसाच्या खर्चिक सोहळ्याला फाटा देत त्यांनी तहसील कार्यालयाला ४२ महापुरुषांच्या नवीन प्रतिमा भेट स्वरूपात दिल्या.
कार्यालयात शासकीय जयंती साजरी केल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या जुन्या प्रतिमा जीर्ण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जगदीश पाटील यांनी स्वखर्चातून या प्रतिमा उपलब्ध करून देत कार्यालयाप्रती तसेच महापुरुषांप्रती आपला आदर व्यक्त केला. जगदीश पाटील हे महसूल विभागातील एक आदर्श कर्मचारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आतापर्यंत जळगाव जिल्हास्तरावर दोन वेळा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार, तहसील स्तरावर एकदा आणि प्रांत कार्यालयाकडून एकदा, अशा एकूण चार वेळा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले आहे.
वाढदिवस म्हणजे कार्यालयासाठी योगदान
विशेष म्हणजे जगदीश पाटील दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून तहसील कार्यालयासाठी काही ना काही सामाजिक योगदान देत असतात. याआधीही त्यांनी कार्यालय परिसरातील झाडांना सिमेंटचे कट्टे बांधणे, परिसर सुशोभित करण्यासाठी झाडांच्या कुंड्या भेट देणे, पाण्याच्या शीतकाची दुरुस्ती, महिला स्वच्छतागृहासाठी नवीन पाण्याची टाकी उपलब्ध करून देणे आणि स्वच्छता अभियान राबविणे असे विविध उपक्रम वाढदिवसानिमित्त राबविले आहेत. जगदीश पाटील यांच्या या सामाजिक बांधिलकीचे तसेच कार्यालयाप्रती असलेल्या निष्ठेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply