
पाडळसरे येथे चैत्रोत्सवानिमित्त हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत कथा
हनुमान जयंतीला काल्याच्या कीर्तनाने सांगता
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील श्रीक्षेत्र पाडळसरे येथे यंदाही ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षाच्या प्रारंभानिमित्त श्रीराम जन्मोत्सव, ग्रामदैवत इच्छापूर्ती अंबिका देवीचा जागर आणि हनुमान जयंतीनिमित्त चैत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ मार्चपासून सुरू होणारा हा उत्सव २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीला काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद वितरणाने होणार आहे.
चैत्रोत्सवानिमित्त इच्छापूर्ती अंबिका देवी मंदिराच्या प्रांगणात विधिवत गुढी उभारून विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती, श्रीमद भागवत, गीता व देवी भागवत ग्रंथ स्थापित करून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत महापुराण कथेला सुरुवात होणार आहे. २६ रोजी दुर्गा अष्टमीपासून या कार्यक्रमास प्रारंभ होईल. कीर्तन सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती व देवीची आरती, सकाळी ८ ते ११ या वेळेत वेदमूर्ती हभप दिलीप पाठक यांचे श्रीमद भागवत कथेचे निरूपण, दुपारी १ ते ३ देवीचा नामजप, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ८.३० ते १०.३० जाहीर कीर्तन व देवीचा जागर असा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात आळंदी येथील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार असून २६ रोजी हभप रामेश्वर महाराज नागेश्वरकर, २७ रोजी हभप जयेश महाराज निमकर, २८ रोजी हभप दिनेश महाराज निमकर, २९ रोजी हभप शामसुंदर महाराज घोडगावकर, ३० रोजी हभप श्रीराम महाराज भोणेकर, ३१ रोजी हभप भोला महाराज पाडळसरेकर यांची कीर्तने होणार आहेत. तसेच ३१ रोजी दुपारी ४ ते ६ पालखी सोहळ्याची मिरवणूक निघणार असून रात्री हभप आकाश महाराज पाडळसरेकर यांचे जागर कीर्तन होईल.
२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सकाळी ८ ते १० या वेळेत हभप आकाश महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून याच कार्यक्रमाने कीर्तन सप्ताहाची सांगता होणार आहे. या चैत्रोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply