जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी सरपंच सचिन पाटील स्वखर्चाने भरणार

अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी तालुक्यातील अंतुर्ली-रंजाणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सचिन बाळू पाटील यांनी अभिनव निर्णय घेतला आहे. गावातील जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देतील, त्यांच्या घराची संपूर्ण घरपट्टी स्वतःच्या खर्चातून भरण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकून राहाव्यात आणि त्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी खासगी शैक्षणिक संस्थांच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्हा परिषद शाळांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना, गावाचा विकास म्हणजे केवळ भौतिक सुविधा नसून शैक्षणिक विकासही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सचिन पाटील यांनी अधोरेखित केले. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संस्कार, संस्कृती आणि मूल्याधिष्ठित शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या शाळांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीमार्फत मोफत शुद्ध आरओ पाणी पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. याबाबत बोलताना सचिन पाटील म्हणाले, “घरपट्टी माफ करण्याचे अनेक ग्रामपंचायतींनी जाहीर केले; मात्र शासनाच्या नियमांमध्ये तशी तरतूद नसल्याने मी संबंधित पालकांची घरपट्टी स्वतःच्या खर्चातून भरणार आहे.”

 

डांगरीतील ‘बाळा मास्तर’ यांचाही पुढाकार

 

दरम्यान, तालुक्यातील डांगरी येथील केंद्रप्रमुख किरण भरतराव शिसोदे (बाळा मास्तर) यांनीही जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी पुढाकार घेतला आहे. डांगरी गावातील इयत्ता दुसरी ते चौथीमध्ये जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाच पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी आपल्या वडील कै. भरतराव पंडितराव शिसोदे यांच्या स्मरणार्थ स्वतः भरून पावती पालकांच्या ताब्यात देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधी व शिक्षणप्रेमींनी घेतलेल्या या उपक्रमांचे परिसरात कौतुक होत असून, यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशसंख्या वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *