किरकोळ वादातून नंदगावात महिलेच्या घरात घुसून मारहाण; सासूच्या पायावर वीट मारून केले जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) कोणतेही ठोस कारण नसताना एका महिलेला व तिच्या सासूला पाच जणांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास नंदगाव येथे घडली. याप्रकरणी दीपाली प्रकाश बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दीपाली प्रकाश बिऱ्हाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्या घराबाहेर झाडू मारत असताना मुलींमध्ये भांडण झाले. त्यावेळी शीतल विजय रायसिंग हिने शेजारील काजल हिला ‘काय चुगली चाभाडी केली’ या कारणावरून काजल व शीतल यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये समजोता झाला. मात्र २० सप्टेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजता दीपाली प्रकाश बिऱ्हाडे यांचे पती मोटरसायकल काढत असताना राहुल अचानक तेथे आला. त्याने दीपाली यांच्या पतीला मागून पकडून मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी दीपाली घरात असताना समाधान शिवाजी बिऱ्हाडे याने घरात घुसून त्यांना मारहाण केली तसेच त्यांची साडी धरून ओढाताण केली. त्यानंतर शिवाजी बिऱ्हाडे व काजल पवार यांनी दीपाली प्रकाश बिऱ्हाडे यांना खाली पाडून मारहाण केली. यावेळी बाजूला पडलेली वीट उचलून सासू सखुबाई यांच्या पायाला मारून त्यांनाही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी दीपाली प्रकाश बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात समाधान शिवाजी बिऱ्हाडे, शिवाजी बिऱ्हाडे, काजल पवार, शीतल रायसिंग आणि राहुल यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३२९(४), १८९(२), १९१(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उदय बोरसे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *