सात्रीचे पुनर्वसन रखडले, पर्यायी रस्ताही अधांतरी; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील सात्री गावाचे पुनर्वसन रखडले असून गावाच्या पर्यायी पोहोच रस्त्याचे कामही प्रलंबित आहे. गावाला रस्ताच नसल्याने पुराच्या परिस्थितीत वेळेत उपचार घेता न आल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे यांनी मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास काळा ध्वज फडकवून, मुंडन करून निषेध करण्याचा तसेच १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. त्याचबरोबर गावाला जोडणाऱ्या पर्यायी पोहोच रस्त्याचे कामही रखडल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे आजारी व्यक्तींना उपचारासाठी वेळेत बाहेर नेता येत नसल्याने जीविताला धोका निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पुरामुळे उपचार घेता न आल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर सरपंच महेंद्र बोरसे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. गृहसंपादन निवाडा घोषित करून बाधितांना योग्य तो मोबदला तातडीने अदा करावा, प्रचलित कायद्यानुसार बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण करून तातडीने पुनर्वसन व पुनर्वसाहत करावी, पुराच्या परिस्थितीत उपचार न मिळाल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी आणि सात्रीच्या पर्यायी पोहोच रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच या प्रलंबित विषयांवर बैठक घेऊन प्रश्नांना चालना द्यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून गृहसंपादनाचा प्रस्तावही प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप सरपंच महेंद्र बोरसे यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षित दळणवळणापासून वंचित राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे व्यथित झालेल्या सात्री ग्रामस्थांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच दुपारी ४ वाजता पालकमंत्री यांच्या पाळधी, ता. जळगाव येथील निवासस्थानी काळा झेंडा फडकवून आणि मुंडन करून निषेध करण्यात येईल. त्यानंतरही मागण्या मंजूर न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल आणि त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांना देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, पाटबंधारे विभाग तसेच निम्न तापी प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सात्री गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न, गृहसंपादनाचा प्रलंबित प्रस्ताव आणि पर्यायी रस्त्याचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावून ग्रामस्थांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *