
अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास; चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रस्त्यावरील समर्थ नगर परिसरात बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ८ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हेमंत प्रकाश विसपुते हे त्यांच्या वडिलांच्या कमरेच्या शस्त्रक्रियेसाठी ८ एप्रिल रोजी रात्री घराला कुलूप लावून नाशिक येथे गेले होते. दरम्यान, १२ एप्रिल रोजी शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून घराचा दरवाजा उघडा असून कडी-कोंडा तोडलेला असल्याची माहिती दिली. मात्र, ते त्या वेळी दवाखान्यात असल्यामुळे तातडीने घरी येऊ शकले नाहीत. १४ एप्रिल रोजी ते अमळनेर येथे परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच देवघरातील चांदीचे देवही गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सविस्तर तपासणी केली असता चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे काफ, ८ हजार रुपये किमतीची १० भार चांदीची लक्ष्मीची मूर्ती, ८ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची गणेश मूर्ती, १६०० रुपये किमतीची दोन भार वजनाची चांदीची समई तसेच २४०० रुपये किमतीचे ३ भार वजनाचे चांदीचे फुलपात्र असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले. याप्रकरणी १९ एप्रिल रोजी विसपुते यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

Leave a Reply