
जनगणनेत विद्यार्थ्यांचा सहभाग; साने गुरुजी विद्यालयातील ५०० विद्यार्थी ‘स्वगणना प्रमोटर्स’
अमळनेर (प्रतिनिधी) जनगणना या राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थी ‘स्वगणना प्रमोटर्स’ म्हणून पुढाकार घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरासह किमान दहा घरांची स्वगणना करण्याची जबाबदारी स्वीकारली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने जनगणना कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यार्थी se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःच्या घराची तसेच परिसरातील घरांची माहिती नोंदवणार आहेत. मोबाईलवर सहजपणे ही प्रक्रिया पूर्ण करता येत असल्याने विद्यार्थ्यांना हे कार्य सोपे व उपयुक्त ठरत आहे. साने गुरुजी विद्यालयाचे सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच उपशिक्षक व जनगणना प्रशिक्षक डी. ए. धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना केवळ स्वतःचीच नव्हे तर इतरांचीही स्वगणना करण्यासाठी प्रेरित करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून जनगणना प्रक्रियेला मोठे बळ मिळणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील स्वगणनेचे प्रमाण वाढण्यास मदत होणार असून नागरिकांनाही जनगणनेचे महत्त्व समजावून सांगण्याचे काम विद्यार्थी करत आहेत. राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी घेतलेली ही जबाबदारी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply