साने गुरुजी विद्यामंदिरची; जळगाव ते हैदराबाद विमान प्रवासाचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

अमळनेर (प्रतिनिधी) शाळकरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक सहलींना विशेष महत्त्व असते. सहल जर थेट विमानातून असेल, तर तो अनुभव विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी आठवणीत राहणारा ठरतो. अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेने यंदा प्रथमच जळगाव ते हैदराबाद असा विमान प्रवास समाविष्ट असलेली आगळीवेगळी शैक्षणिक सहल आयोजित करून विद्यार्थ्यांना अविस्मरणीय अनुभव दिला. तर विद्यार्थ्यांसाठी ही सहल आयुष्यभर स्मरणात राहणारा अनुभव ठरली.

या सहलीला विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे सहलीचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील सहल २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पार पडली, तर दुसऱ्या टप्प्यातील सहल ४ ते ८ मार्च दरम्यान यशस्वीरीत्या झाली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विमान प्रवासाचा थरार आणि आनंद मनसोक्त अनुभवला. जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ (फ्लाय 91) या विमानाने विद्यार्थ्यांनी हैदराबादकडे उड्डाण केले. अनेक विद्यार्थ्यांचा हा पहिलाच विमान प्रवास असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, कुतूहल आणि आनंद पाहायला मिळत होता. विमानतळावरील सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव विद्यार्थ्यांनी जवळून घेतला. हैदराबाद येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक व शैक्षणिक स्थळांना भेट दिली. चारमिनार आणि गोलकोंडा किल्ला येथे विद्यार्थ्यांनी भव्य स्थापत्यकला आणि ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेतली. सालार जंग संग्रहालयातील प्राचीन कलावस्तू पाहून विद्यार्थी थक्क झाले. नेहरू प्राणी संग्रहालयात विविध प्राणी व पक्ष्यांचे निरीक्षण करत विद्यार्थ्यांनी जैवविविधतेचा अभ्यास केला.

याशिवाय हुसेन सागर तलावात बोट सफारीचा आनंद घेतला, तर लुंबिनी पार्कमधील आकर्षक लेझर शो विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरला. तसेच रामोजी फिल्म सिटीत चित्रपटातील दृश्यांचे चित्रीकरण कसे केले जाते आणि ते पडद्यावर कसे सादर केले जाते याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे रील आणि रियलमधील फरक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजून घेता आला. या शैक्षणिक सहलीची दखल ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीनेही घेतली. जळगाव विमानतळावर विद्यार्थ्यांचा सामूहिक फोटो काढून कंपनीने या सहलीचा आनंद द्विगुणित केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न साकार केल्याबद्दल विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला कॉमिक्स भेट देत हा संस्मरणीय क्षण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रसिद्ध केला. शाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम राबविल्याबद्दल कंपनीने शाळा प्रशासनाचे विशेष कौतुक केले.

शाळेच्या शिक्षकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहलीचे नियोजन केले होते. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, निवासाची व सुरक्षिततेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. साने गुरुजी विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना बाह्य जग, आधुनिक तंत्रज्ञान व सांस्कृतिक वारशाचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते.

शाळेच्या या धाडसी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांकडूनही कौतुक करण्यात आले. सहलीचे नियोजन संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मनोज पाटील, महेंद्र रामोशे, पंडित क्षीरसागर, मोनिका पाटील, मालती पवार, मुरलीधर मगरे, रवींद्र कोळी, राहुल पाटील, सूर्यकांत पाटील, सुनीता पाटील आणि सुवर्णा पाटील यांनी केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *