
चिमनपुरी पिंपळे येथे जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला समन्वय सरपंच परिषद मुंबईच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील होत्या. व्यासपीठावर भारती पाटील, विजया पाटील, श्रद्धा पाटील व रेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महिलांसाठी आदर्श ठरलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. या विशेष दिनाचे औचित्य साधत महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांची माहिती घेतली. वाचनालयाच्या माध्यमातून ज्ञानाची दारे खुली होतात, या भावनेतून महिलांनी पुस्तकांविषयी विशेष उत्सुकता दर्शवली. महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून देताना वर्षा पाटील यांनी उपस्थित महिलांना समाजातील वास्तव परिस्थिती, महिलांची भूमिका तसेच आई म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवून समाजात सक्षमपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, स्वावलंबन आणि जागरूकता यांच्या माध्यमातून महिलांनी समाजातील बदलाचे नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मातांचा व भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती मॅडम यांनी केले, तर श्रद्धा पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

Leave a Reply