
रिश्त्यासाठी आले अन् निकाह करूनच परतले; डॉक्टर नवरी, कॉन्ट्रॅक्टर नवरदेवाचा साधेपणाचा संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात शनिवारी साधेपणाचा संदेश देणारा निकाह पार पडला. पुणे येथील कॉन्ट्रॅक्टर नोमान मोहम्मद सैय्यद आणि अमळनेरच्या इस्लामपुरा भागातील रहिवासी डॉ. अल्फिया अख्तर पठाण यांचा निकाह जोहरच्या नमाजनंतर इस्लामपुरा मशिदीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे, नवरदेवाचे कुटुंब रिश्ता करण्यासाठी आले होते; मात्र दोन्ही कुटुंबांची सहमती झाल्यानंतर कोणताही मोठा सोहळा किंवा अनावश्यक विधी न करता त्याच वेळी निकाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रिश्ता करण्यासाठी आलेले कुटुंब निकाह करूनच परतले.
याबाबत अधिक माहिती अशी कीं, नोमान मोहम्मद सैय्यद हे पुणे येथे कॉन्ट्रॅक्टर असून, डॉ. अल्फिया अख्तर पठाण या डॉक्टर आहेत. दोन्ही कुटुंबांनी निकाहासाठी कोणताही भव्य कार्यक्रम आयोजित न करता साधेपणाला प्राधान्य दिले. या निकाहात अनेक अनावश्यक रीतिरिवाज, दिखावा आणि खर्चाला फाटा देण्यात आला. निकाहासाठी केवळ २० ते २५ जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
मशिदीत जोहरच्या नमाजनंतर निकाह
शनिवारी जोहरच्या नमाजनंतर इस्लामपुरा मशिदीत निकाहाची प्रक्रिया पार पडली. मौलवी अजहर यांनी निकाह पढविला. निकाहपूर्वी त्यांनी समाजात साधेपणाने निकाह करण्याची गरज व्यक्त केली.
“पैगंबर साहेबांनीही निकाह सोपा करण्याची शिकवण दिली”
मौलवी अजहर यांनी सांगितले की, पैगंबर साहेबांनीही निकाह सोपा आणि सुलभ करण्याची शिकवण दिली आहे. निकाहासाठी अनावश्यक खर्च, दिखावा आणि अवाजवी रीतिरिवाज टाळून साधेपणाने निकाह केला पाहिजे. त्यामुळे कुटुंबांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचतात, तसेच समाजातही सकारात्मक संदेश जातो.
साधेपणाच्या निकाहातून समाजाला संदेश
डॉक्टर नवरी आणि कॉन्ट्रॅक्टर नवरदेव असतानाही दोन्ही कुटुंबांनी कोणताही दिखावा न करता मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत निकाह केला. रिश्ता करण्यासाठी आले आणि निकाह करूनच परतले, ही बाब या विवाहाचे विशेष आकर्षण ठरली. साधेपणाने झालेल्या या निकाहातून अनावश्यक खर्च आणि रीतिरिवाजांना बाजूला ठेवून निकाह सुलभ करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply