ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त १५१ वृक्षलागवडीचा संकल्प

अमळनेर (प्रतिनिधी) : ईद-ए-मिलादुन्नबी स.अ.च्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासह विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्याचा निर्णय अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. आमदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

बैठकीस जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील तसेच फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी अल खिदमत ट्रस्ट, अमळनेरच्या सदस्यांच्या वतीने गौतम अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ईद-ए-मिलादुन्नबी स.अ.च्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत १५१ वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. वृक्षलागवडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांमध्ये हरित चळवळीबाबत जनजागृती करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

याशिवाय समाजोपयोगी आणि गरजूंसाठी उपयुक्त ठरणारे विविध विधायक उपक्रम भविष्यात अल खिदमत ट्रस्ट आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन, गरजू नागरिकांना मदत आणि समाजहिताच्या विविध कार्यांना चालना देण्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी एकत्रितपणे समाजाच्या विकासासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीस अल खिदमत ट्रस्ट, अमळनेरचे सर्व सदस्य तसेच जयनिल फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. ईद-ए-मिलादुन्नबी स.अ.च्या निमित्ताने हाती घेण्यात आलेल्या १५१ वृक्षलागवडीच्या या उपक्रमातून ‘पर्यावरणाचे रक्षण आणि मानवतेची सेवा’ हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आगामी काळातही दोन्ही संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *