
साने गुरुजी विद्यालयात बासरी साधक योगेश पाटील यांना गुरुवंदना
अमळनेर (प्रतिनिधी) : साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी बासरी साधक आणि बासरी कलेचे प्रसारक योगेश पाटील यांना त्यांच्या शिष्यपरिवाराच्या वतीने भावपूर्ण गुरुवंदना अर्पण करण्यात आली. खान्देशासह महाराष्ट्र आणि देशभरात बासरी वादनाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या योगेश पाटील यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
योगेश पाटील हे अनेक वर्षांपासून बासरी हे वाद्य घराघरात पोहोचविण्यासाठी कार्यरत आहेत. पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित विवेक सोनार यांच्या परंपरेतील बासरी शिक्षण व प्रशिक्षण ते देत आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, बुलढाणा, मुंबई, अकोला यांसह भोपाल, सुरत, जयपूर आणि इंदूर येथे जाऊन त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले आहेत. गुरुपूजन सोहळ्यात प्रशांत कुलकर्णी (नेपानगर) यांनी मंत्रपुष्पांजली अर्पण करून गुरुपूजन केले. त्यानंतर विविध शिष्यांनी बासरी वादन व गायन सादर करून गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये संदीप घोरपडे (अमळनेर) यांनी “अच्युतम केशवम” हे भजन, गोपाल बडगुजर (मुकटी) यांनी राग भूपाली, डॉ. दिव्यल चौधरी (नाशिक) यांनी राग यमन, परमानंद दिदी (जळगाव) यांनी रामभजन, विलेश राजपूत (बेटावद) यांनी “देखा एक ख्वाब”, निलेश सोनवणे (फेकरी) यांनी “बडा दुःख दिया”, प्रशांत कुलकर्णी (नेपानगर) यांनी राग वृंदावनी सारंग, तुषार पुराणिक (भुसावळ) यांनी राग दुर्गा, संगीता नेवे यांनी “पल पल दिल के पास”, निशांत परदेशी (फैजपूर) यांनी “जब दीप जले”, अर्णव पाटील (अमळनेर) यांनी महाभारत धून, हरिश पाटील (शिरपूर) यांनी राग बिहाग, घनश्याम माळी (धुळे) यांनी “मोहे रंग दो लाल”, सुनिल कासार (पुणे) यांनी माऊथ ऑर्गनवर तसेच बासरीवर विविध धून आणि वैदेही पुराणिक (अमेरिका) यांनी राग शिवरंजनी सादर केला.
यानंतर सर्व शिष्यांनी एकत्रितपणे राग भूपाली सादर करून गुरुवंदना अर्पण केली. या सादरीकरणास धुळे येथील तबलावादक विवेक गुरव यांनी साथ दिली. तसेच तुषार पुराणिक (भुसावळ) यांचे स्वतंत्र तबलावादनही झाले.
कार्यक्रमाच्या समारोपात योगेश पाटील यांनी शास्त्रीय बासरी वादन सादर करत राग पुरीया धनाश्रीची प्रभावी मांडणी केली. त्यांना तबला साथ योगेश दादा संदानशिव यांची लाभली. पाहुणे कलावंत म्हणूनही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सोलो बासरीवादनात तानपुरा साथ डॉ. दिव्यल चौधरी (नाशिक) यांनी केली. यावेळी संदीप घोरपडे, निलेश सोनवणे आणि गोपाल बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप घोरपडे यांनी गुरुजींबद्दल बोलताना, “गुरुजींचे जीवनच बासरीमय आहे. बासरीप्रमाणेच त्यांचे मनही स्वच्छ आणि निर्मळ आहे. स्वतः अनेक वेदना सहन करून ते इतरांचे आयुष्य स्वरमय आणि आनंदमय करतात,” असे भावनिक उद्गार काढले.
परमानंद दिदी यांनी भागवत ग्रंथातील श्लोकांचे विवेचन केले, तर निशांत परदेशी यांनी स्वरचित कविता सादर करून भावना व्यक्त केल्या. संगीता नेवे यांनी योगेश पाटील यांना मुलासमान मानत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात डॉ. दिव्यल चौधरी यांनी साकारलेला “शिष्य परिवार वृक्ष” विशेष आकर्षण ठरला. या वृक्षाच्या मुळाशी गुरुजींचे स्थान दर्शविण्यात आले असून विविध फांद्यांवर शिष्यांची नावे आणि अंगठ्यांचे ठसे घेऊन गुरुंकडून मिळालेले ज्ञान, संस्कार आणि संगीताची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत असल्याची संकल्पना साकारण्यात आली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख (अमळनेर) उपस्थित होते. त्यांनी बासरी, अध्यात्म आणि योग यांच्यातील नात्याचे सुंदर विश्लेषण करत साधकांना मार्गदर्शन केले. “शरीर, मन आणि बुद्धी यांचा समन्वय साधणारे बासरीवादन साधकाला चैतन्याच्या उंच शिखरावर घेऊन जाते,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलेश राजपूत (बेटावद) आणि हरिश पाटील (शिरपूर) यांनी केले.

Leave a Reply