
अमळनेरात सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी २० ते २९ मे दरम्यान‘बाल गोपाल बाल संस्कार शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) योग विद्या गुरुकुल, नाशिक यांच्या माध्यमातून अमळनेर येथे ‘बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. “सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुवर्णसंधी” या संकल्पनेवर आधारित हे शिबिर २० मे ते २९ मे दरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
बालकांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकास घडवून आत्मविश्वासपूर्ण, संस्कारी व सक्षम व्यक्तिमत्त्व निर्माण करणे हा शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या शिबिरामध्ये योगाभ्यास, प्राणायाम, ध्यान साधना, बौद्धिक व शारीरिक खेळ, स्वावलंबन व नेतृत्व गुणांचा विकास, सांघिक भावना, सकारात्मक विचार, मंगलाचरण आणि योगनिद्रा यांचा समावेश असणार आहे. तसेच पुणे येथील हेल्थ कोच योग शिक्षक सचिन डोंगरे यांचे प्रेरणादायी ऑनलाइन मार्गदर्शनही लाभणार आहे. शिबिरामुळे शारीरिक सुदृढता, मानसिक स्थैर्य, एकाग्रता, बौद्धिक विकास, भावनिक संतुलन, आध्यात्मिक प्रगती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. ७ ते १४ वर्षे वयोगटातील शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम मुलांसाठी प्रवेश खुला असून हे उपचार शिबिर नसल्याने व्याधीग्रस्त मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. हे शिबिर साने गुरुजी शिक्षक पतसंस्था हॉल, शेतकी संघ जिनिंगच्या मागे, क्रांती नगर, धुळे रोड, अमळनेर येथे होणार आहे. नोंदणीसाठी योग शिक्षिका ज्योती पाटील( ८५५१९५११६७), तिलोत्तमा पाटील (९४२३३६७१११), लीना पाटील (९४२२२९२२२२) आणि मनीषा पाटील (९४२३९७६१४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मर्यादित प्रवेश असल्याने पालकांनी लवकर नोंदणी करावी, असेही आयोजकांनी म्हटले आहे.

Leave a Reply