
मुसळी गावाजवळ भीषण अपघातात सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे जखमी
जळगावकडे बैठकीसाठी जात असताना वाहन पलटी; एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील सात्री येथील सरपंच महेंद्र बोरसे यांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन ते जखमी झाल्याची घटना १७ रोजी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी मुसळी गावाजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरपंच महेंद्र बोरसे हे सात्री गावाच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसनासंदर्भात जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीसाठी वाहन (क्रमांक १२३४ ) ने जात होते. मुसळी गावाजवळ अचानक काहीतरी आडवे आल्याने त्यांनी तत्काळ ब्रेक दाबला. त्याचवेळी समोर उभ्या असलेल्या पिकअप व्हॅनचा दरवाजा उघडा असल्याने तो वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनाचे संतुलन बिघडले. नियंत्रण सुटल्याने वाहनाने पलटी घेत रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की वाहनातील एअरबॅग उघडल्या गेल्या. या अपघातात बोरसे यांच्या मानेवर, खांद्यावर, पोटावर तसेच डोळ्याला दुखापत झाली आहे.
स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ग्रामस्थांकडून प्रार्थना केली जात आहे.

Leave a Reply