
निम शिवारात हिंस्र प्राण्याचा धुमाकूळ; गोशाळेतील तीन वर्षीय वासराचा फडशा!
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम शिवारात एका हिंस्र प्राण्याने गोशाळेतील तीन वर्षीय वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमळनेर येथील डॉ. संदीप जोशी यांच्या शेतात सुरू असलेल्या गोशाळेच्या आवारात ही घटना घडली. दुसऱ्या दिवशी शेतावर कामासाठी आलेल्या शेतकऱ्याला वासरू मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करून वासरावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून ‘तळस’ असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम गावाच्या शिवारात डॉ. संदीप जोशी यांच्या मालकीचे शेत असून, या शेतातील कामकाज निम येथील शेतकरी सुदाम पाटील पाहतात. शेतात गोशाळा सुरू असून, त्याच गोशाळेच्या आवारात तीन वर्षीय वासरू होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास एका हिंस्र प्राण्याने वासरावर हल्ला चढवून त्याला ठार केले. दुसऱ्या दिवशी सुदाम पाटील कामाच्या ठिकाणी आले असता त्यांना वासरू मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने अमळनेर वनक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरम्यान, वनपाल गुलाब पिंजारी यांनी या घटनेबाबत माहिती देताना वासरावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून ‘तळस’ हा हिंस्र प्राणी असल्याचे सांगितले. घटनास्थळी आढळलेल्या प्राण्याच्या पायांच्या ठशांच्या आधारे वनविभागाने हा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चांना वनविभागाने पूर्णविराम दिला आहे. मात्र, शेतकरी बांधवांनी रात्रीच्या वेळी शेतात जाताना आणि परत येताना विशेष खबरदारी घ्यावी. तसेच परिसरात बिबट्या असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनपाल गुलाब पिंजारी यांनी केले आहे.

Leave a Reply