
फाफोरेत सबस्टेशनचे काम अपूर्ण, तरी एप्रिलपासून वीजपुरवठा सुरू! रस्त्यालगतच्या कामावर प्रश्नचिन्ह
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील फाफोरे येथे उभारण्यात येत असलेल्या विद्युत सबस्टेशनचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही एप्रिल महिन्यापासून येथून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. सबस्टेशनचे काम किती रुपयांचे आहे, कोणत्या ठेकेदाराला देण्यात आले, कार्यारंभ आदेश कधी देण्यात आला आणि कोणत्या बांधकाम व विद्युत अभियंत्यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे, याबाबत अमळनेर-धरणगाव कार्यालयात स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या कामाची अंदाजित किंमत, ठेकेदार, कार्यारंभ आदेशाची प्रत, कामाची मुदत व संबंधित अभियंत्यांची माहिती विचारली असता ‘सर्व प्रक्रिया जळगाव कार्यालयातून होते’ एवढेच उत्तर देण्यात येत असल्याचे समोर आले. जळगाव कार्यालयातील संबंधित अभियंत्यांकडेही माहिती मागितली असता माहिती देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे महत्त्वाच्या विद्युत प्रकल्पाच्या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. फाफोरे सबस्टेशन रस्त्यालगत असून त्याचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. अशा स्थितीत एप्रिलपासून विद्युत पुरवठा सुरू करण्याचा निर्णय कोणाच्या आदेशाने घेण्यात आला, पुरवठा सुरू करण्यापूर्वी तांत्रिक व सुरक्षा तपासणी झाली होती का, तसेच बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे का, याबाबतही स्पष्टता नाही. सबस्टेशनच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, कामात वापरलेले साहित्य, काँक्रीट, संरक्षक भिंत व विद्युत सुरक्षाव्यवस्थेची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे. शासकीय कामाच्या ठिकाणी कामाची माहिती दर्शविणारा फलक लावणे अपेक्षित असताना फाफोरे सबस्टेशनच्या ठिकाणी असा माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाची अंदाजित किंमत, ठेकेदाराचे नाव, कामाची मुदत, संबंधित विभाग व अभियंते आदी माहिती असलेला फलक न लावल्याने संपूर्ण कामाची माहिती नागरिकांपासून लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित ठेकेदार दुसऱ्या जिल्ह्यातील असल्याने कामाबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यालगत सबस्टेशनचे बांधकाम अपूर्ण असताना विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. उद्या येथे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. फाफोरे सबस्टेशनच्या कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून मंजूर अंदाजपत्रक, कार्यारंभ आदेश, ठेकेदार, संबंधित अभियंते, गुणवत्ता तपासणी अहवाल तसेच एप्रिलपासून विद्युत पुरवठा सुरू करण्यास दिलेली परवानगी याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?’
फाफोरे सबस्टेशनचे बांधकाम अपूर्ण असतानाही एप्रिलपासून विद्युत पुरवठा सुरू आहे. कामाची किंमत, ठेकेदार, कार्यारंभ आदेश व संबंधित अभियंत्यांची माहिती स्थानिक कार्यालयाकडे नसणे गंभीर आहे. रस्त्यालगत अपूर्ण बांधकामामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून तांत्रिक तपासणी करावी आणि एप्रिलपासून वीजपुरवठा सुरू करण्याचा निर्णय कोणाच्या आदेशाने झाला, हे स्पष्ट करावे.
— जितेंद्र पाटील, माजी सरपंच, फाफोरे, ता. अमळनेर
तक्रारींची पाहणी करून कार्यवाही करू
फाफोरे येथील सबस्टेशनचे काम संबंधित विभागाच्या नियमानुसार सुरू आहे. कामाची तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया जळगाव स्तरावरून करण्यात आलेली आहे. सबस्टेशनमधून वीजपुरवठा सुरू करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे. बांधकामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. कामाची सविस्तर माहिती संबंधित विभागाकडून उपलब्ध करून दिली जाईल.
— धनंजय धांडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, अमळनेर

Leave a Reply