
दहिवद येथे खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवात कलेतून साकारले पौराणिक पात्रांचे जिवंत दर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथे रविवारी खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातील हौशी कलाकारांनी साकारलेले पौराणिक पात्रांवर व रामायण कथेवर आधारित देवांचे वहन. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही सादर करण्यात आला असून दहिवद पंचक्रोशीत तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.
दहिवद गावातील तरुण या कलेच्या माध्यमातून पौराणिक कथा, रामायण, महाभारत आणि विष्णू अवतारांच्या रंजक कथा, यात्रेत सादर करून लोकसंस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यंदाचे विशेष म्हणजे रामायणातील लंकाधिश अर्थात रावणाची भूमिका पुणे पिंपरी चिंचवड महापालिकाचे उपायुक्त असलेले आणि मूळचे दहिवदचे निलेश भदाणे यांनी अतिशय उत्कृष्टपणे साकारली. क्लास वन अधिकारी असणारे भदाणे यांनी रावण हे पात्र जणू जिवंत केले. त्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. भदाणे यांच्यासह सुरेश भदाणे, आनंदराव देसले, लोटन माळी,चिंधू लोहार, भानुदास लोहार,भटू भदाणे, प्रकाश शेलकर, भटू माळी, तुषार पाटील, जिजाबराव माळी, गणेश देसले, कृष्णकांत भदाणे, मनिष भदाणे, मोहित भदाणे यांचेसह गावातील अनेक नागरिकांनी यावेळी रामलिला वहनात भाग घेतला. पौराणिक पात्रांवर व रामायण कथेवर आधारित देवांचे वहन हा कार्यक्रम दहिवद पंचक्रोशीत मोठा लोकप्रिय आहे, पौर्णिमेच्या व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बारागाडे ओढण्याचा कार्यक्रम झाला. यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे सलग दोन दिवस रात्रीच्या वेळी गावात पौराणिक पात्रांवर व रामायण कथेवर आधारित देवांचे वहन (वन्ह ) हा कार्यक्रम गावातील नागरींकांद्वारे उत्सफुर्तपणे सादर केला गेला. सदर परंपरा हि वर्षानुवर्षे सादर केली जात असून मागील 5 ते 6 पिढ्यांपासून गावात या कलेचे जतन केले जात आहे. मग त्यात निलेश भदाणे यांच्या सारखे उच्च पदस्थ अधिकारी देखील सहभागी होऊन गावाची ही अनोखी परंपरा जतन करताना दिसून येत आहेत.
ग्रामस्थांनी ओढल्या बारागाडी
शनिवारी आणि रविवारी साजरा झालेल्या या यात्रोत्सावात खंडेराव मंदिराचे भक्त हिंमत अहिरे यांनी बारागाडी ओढल्या तर त्यासाठी त्यांना सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.ही परंपरा देखील दहिवद गावात शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यात सर्व गावकरी एकत्र येऊन यात्रोत्सव साजरा करतात, ही परंपरा पुढे ही सुरु ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply