अमळनेरात आज चेट्री चंद्र निमित्त भव्य शोभायात्रा; भगवान झुलेलाल जन्मोत्सवाचा उत्साह

अमळनेर (प्रतिनिधी)  सिंधी समाजाचा प्रमुख सण असलेल्या चेट्री चंद्र निमित्त आज शहरात भगवान झुलेलाल साई जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून सायंकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, भगवान झुलेलाल जन्मोत्सवामुळे सिंधी समाजात आनंद व भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमळनेर शहर सिंधी समाज जनरल पंचायतीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता भाई लुधडासिंग दरबार येथे महाराज स्वामी पंडित किशनचंद शर्मा यांच्या वतीने बहराणा साहेब यांची महापूजा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता याच ठिकाणाहून भगवान झुलेलाल यांची भव्य शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात येणार आहे.

या शोभायात्रेसाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून सिंधी समाजातील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषा, भजन-कीर्तन, ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढली जाणार असल्याने शहरात सणोत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. सर्व समाजबांधवांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन अमळनेर शहर सिंधी समाज पंचायतीचे अध्यक्ष चेलाराम सैनानी, उपाध्यक्ष लालचंद सैनानी, सरजू गोकलानी, सचिव प्रेम सैनानी, सहसचिव नंदलाल पंजवानी तसेच सदस्यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *