
लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील दोन टक्के व्याजाचा वाद पुन्हा पेटला; वसुली तातडीने बंद करण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेकडून नागरिकांकडून घेतली जाणारी “लोकवर्गणी” आणि पाणीपट्टीवर आकारण्यात येणारे दोन टक्के व्याज या दोन्ही मुद्द्यांवर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही प्रकारच्या वसुलीला कायदेशीर आधार नसून ती तातडीने बंद करण्यात यावी, अशी ठाम मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १७ जुलै २०२६ रोजी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची भेट घेऊन ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या विविध तक्रारी मांडल्या. नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून “लोकवर्गणी” या नावाखाली बेकायदेशीर आणि बळजबरीने वसुली करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या वसुलीला कोणताही कायदेशीर आधार नसल्याने ती तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
पाणीपट्टीवरील दोन टक्के व्याजावरही आक्षेप निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०२४-२०२५ पासून नगरपरिषद आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असतानाही ३१ डिसेंबरपासूनच पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कावर दोन टक्के दराने व्याज आकारत आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच व्याज आकारणी सुरू होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अनावश्यक आर्थिक भार पडत असून याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे ग्राहक पंचायतने म्हटले आहे. त्यामुळे ही व्याज आकारणी त्वरित रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.
पूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण ग्राहक पंचायतने यापूर्वीही या विषयावर अनेक वेळा पाठपुरावा केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दि. १७ डिसेंबर २०२४, २२ एप्रिल २०२५ आणि ६ फेब्रुवारी २०२६ रोजीही नगरपरिषद प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती. त्या वेळी “यापुढे लोकवर्गणी आणि दोन टक्के व्याज आकारणी केली जाणार नाही,” असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्राहक पंचायतने केला आहे.
तातडीने निर्णय घेण्याची मागणी लोकवर्गणी आणि पाणीपट्टीवरील व्याज या दोन्ही वसुली तातडीने बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी निवेदन स्वीकारून या विषयावर सकारात्मक आणि योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिल्याचे ग्राहक पंचायतच्या वतीने सांगण्यात आले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या निवेदनावेळी भारती अग्रवाल, कपीला मुठे, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख तसेच ज्येष्ठ पत्रकार व कवी-लेखक सुभाष पाटील घोडगावकर यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply