
भरधाव वाहनाच्या धडकेत उदयनगरजवळ निलगायचा जागीच मृत्यू, नागरिकांध्ये हळहळ
अमळनेर (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका निलगायचा जागीच मृत्यू झाल्याची घटना
तालुक्यातील उदयनगर (डांगर) येथील शाळेजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उदयनगर (डांगर) येथील शाळेजवळ निलगायचा अपघात होऊन मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रकाश वाघ, राजेश वाघ, योगेश पाटील यांनी तत्काळ वनरक्षक दुर्गादास वानखेडे यांना कळविले. वनरक्षक वानखेडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तपासणी केली. अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील कारवाई वनविभागामार्फत करण्यात येत आहे. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी वेगाने वाहने जात असल्याने वन्यजीवांसह नागरिकांनाही धोका निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वन्य जीवांचे रक्षण होण्याची मागणी
दरम्यान, आतापर्यंत अपघातात अनेक वन्यप्राण्यांचे जीव गेले जीव गेले असताना वन विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्याही उपयोजना करीत नसल्याचा आरोप उदय नगरचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ यांनी केला आहे. वन्य क्षेत्राच्या लगत असलेल्या रस्त्यावर वन्य जीवांचे रक्षण व्हावे यासाठी वाहने हळू चालविण्यासंदर्भात फलक लावले जावेत, अशी मागणी प्रकाश वाघ व राजेश वाघ यांनी केली आहे.

Leave a Reply