
इनोमरेशन फॉर्म भरला नाही तर मतदार यादीत नाव येणार नाही : प्रांत अधिकारी मयूर भंगाळे
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष आणि सखोल पुनरिक्षण (एसआयआर – स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) मोहिमेअंतर्गत इनोमरेशन फॉर्म भरला नाही तर मतदार यादीत नाव समाविष्ट होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन प्रांत अधिकारी मयूर भंगाळे यांनी केले.
या मोहिमेत मृत, स्थलांतरित अथवा अपात्र मतदारांची नावे वगळून पात्र नव्या मतदारांची नावे समाविष्ट केली जात आहेत. या प्रक्रियेत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घराघरात जाऊन मतदारांची माहिती व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत. या कामात नागरिकांना तसेच बीएलओंना मदत व्हावी या उद्देशाने युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मधील संत सखाराम महाराज नगर ओपन प्लेस आणि साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ, रामबाग कॉलनी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एसआयआर नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. युवा कल्याण प्रतिष्ठानने प्रभाग क्रमांक ६, ७ आणि ८ मधील प्रत्येक नागरिकाच्या घरी माहितीपत्रक पोहोचवून नोंदणी केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे पाचशे नागरिकांनी इनोमरेशन फॉर्म भरून दिले. त्यामुळे संबंधित बीएलओंनी समाधान व्यक्त केले. एकाच ठिकाणी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी प्रा. अशोक पवार (अध्यक्ष, युवा कल्याण प्रतिष्ठान) तसेच बीएलओंचे आभार मानले. प्रांत अधिकारी मयूर भंगाळे यांनी दोन्ही नोंदणी केंद्रांना भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या मोहिमेत अजय भामरे, धर्मा धनगर, चिंतामण धनके, शिवाजी मोरे, दत्तू कोळी, विकास पाटील, ज्ञानेश्वर भदाणे आणि दिनेश साळुंखे या बीएलओंनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी किरण शिसोदे, अशोक बिऱ्हाडे, पत्रकार संजय पाटील, मुन्ना पवार, मिलिंद मोरे, गोसावी आबा, आनंद पवार आणि सुनील बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. दरम्यान, २६ जुलै २०२६ रोजी प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांसाठी संत सखाराम महाराज नगर ओपन प्लेस येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एसआयआर नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी अशा प्रकारचे सार्वजनिक नोंदणी केंद्र उभारणारी युवा कल्याण प्रतिष्ठान ही अमळनेरमधील एकमेव संस्था असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

Leave a Reply