
एकतास येथे किरकोळ वादातून बाप-लेकाला मारहाण; मारवड पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एकतास गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने शेतात जाऊन वयोवृद्ध शेतकरी आणि त्याच्या मुलाला मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भरत विक्रम पाटील (रा. एकतास) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ११ रोजी सकाळी सुमारे १० वाजता ते आणि त्यांचे वडील विक्रम दामु पाटील हे एकलहरे शिवारातील आपल्या शेतात कपाशीच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेजारील शेतात जेसीबी मशीनद्वारे काम सुरू होते. दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास गावातील सुभाष निंबा वाडिले हे फिर्यादीच्या शेतात आले. तेथे त्यांनी शेजारील शेतमालक सुनिल हंसराज पाटील यांच्याशी बोलताना विक्रम पाटील यांच्याकडे हात दाखवत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यावर विक्रम पाटील यांनी त्यांना असे बोलू नये, असे सांगितले. त्यानंतर सुभाष वाडिले तेथून निघून गेले. मात्र काही वेळाने ते पुन्हा शेतात आले आणि विक्रम पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून भरत पाटील मदतीसाठी धावून आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच आरोपीने हातातील दगडाने भरत पाटील यांच्या डोक्यात वार केल्याने त्यांना दुखापत झाली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्यांना आणि त्यांच्या वडिलांना विहिरीत टाकून देण्याची धमकी देत शिवीगाळही केली. जखमी भरत पाटील यांनी ग्रामीण रुग्णालय, बेटावद येथे उपचार घेतल्यानंतर मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून मारवड पोलिसांनी सुभाष निंबा वाडिले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply