कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी; खेडी गावावर पसरली शोककळा

अमळनेर (प्रतिनिधी) कर्जाच्या वाढत्या ओझ्याने आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे नैराश्यात गेलेल्या अमळनेर तालुक्यातील खेडी येथील श्याम सुनील पाटील (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २७) घडली. या घटनेमुळे खेडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी कुटुंबांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, श्याम सुनील पाटील यांच्याकडे अवघी दीड एकर शेती होती. शेतीतील उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांच्यावर सुमारे तीन लाख रुपयांचे सावकारी कर्ज होते. यंदाच्या खरीप हंगामातही अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता नसल्याने आणि वाढत्या कर्जाच्या ताणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे. रविवारी (दि. २६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास श्याम सुनील पाटील हे घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर दुपारी अडीच वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. श्याम सुनील पाटील यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ता मुलगा कायमचा निघून गेल्याने वडील सुनील विनायक पाटील यांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. या घटनेने संपूर्ण खेडी गाव सुन्न झाले असून शेतकरी अजून किती काळ कर्जाच्या विळख्यात जीव देत राहणार, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *