
मंगळग्रह मंदिरात भव्य महारुद्र पूजेची भक्तिमय पूर्णाहुती असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजेच्या पूर्णाहुतीची अनुभूती
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच आयोजन; तीन दिवसीय सोहळ्याची मंगलमय वातावरणात सांगता
आमदार अनिलदादा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी, लोककल्याण तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय परम पवित्र भव्य महारुद्र अभिषेक पूजेची शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास भक्ती, चैतन्य आणि मंगलमय वातावरणात पूर्णाहुती झाली. या धार्मिक सोहळ्याला असंख्य भाविकांनी उपस्थित राहून महारुद्र पूजेच्या पूर्णाहुतीची अनुभूती घेतली.
बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या तीन दिवसीय धार्मिक अनुष्ठानाची सांगता शुक्रवारी जल्लोषपूर्ण वातावरणात झाली. आमदार अनिलदादा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्रीताई पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद काकळीज यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना, विविध समाजांचे पदाधिकारी व सदस्य, महिला मंडळांच्या पदाधिकारी-सदस्या तसेच स्थानिक, राज्य आणि परराज्यातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती श्री. केशव पुराणिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले हे या धार्मिक सोहळ्याचे विशेष यजमान होते. त्यांच्या शुभहस्ते तीन दिवसीय महारुद्र अभिषेक पूजेचे अनुष्ठान पार पडले.
१२१ आवर्तनांनी हवन; दोन हजारांहून अधिक आहुत्या
पूर्णाहुतीपूर्वी शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व स्थापित देवतांची पूजा करण्यात आली. ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडलावर’ भगवान महादेव, श्री मंगळग्रह देव, भूमिमाता आणि पंचमुखी हनुमानजी यांचे आवाहन करून विधिवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर अरणीमंथन करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला.
नवग्रह रुद्रांची स्थापना करून त्यांचे हवन करण्यात आले. प्रधान देवता श्री मंगळग्रह देव व भगवान महादेव यांच्या प्रीत्यर्थ रुद्राच्या १२१ आवर्तनांनी हवन करण्यात आले. यामध्ये अंदाजे दोन हजार आहुत्या यज्ञात अर्पण करण्यात आल्या. भगवान शंकरांच्या जल्लोषपूर्ण तांडवस्तोत्रामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
यानंतर विशेष हवन, बलिदान व पूर्णाहुतीचा विधी पार पडला. पूर्णाहुतीनंतर महाआरती व मंत्रपुष्पांजली करण्यात आली.
भजनाच्या तालावर भाविकांचा भक्तीमय जल्लोष
पूर्णाहुतीनंतर पुरोहितांनी फडकत्या चालीवर संगीताच्या साथीने शिवशंकरांचे भक्तिगीत सादर केले. या भक्तिमय वातावरणात डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले, आमदार अनिलदादा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्रीताई पाटील यांच्यासह उपस्थित भाविकांनी नृत्याचा आनंद घेतला.
भक्ती, चैतन्य आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात धार्मिक सोहळ्याची जल्लोषपूर्ण सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेतले तसेच प्रसादाचा लाभ घेतला.
अयोध्या, प्रयागराजसह विविध भागांतील पुरोहितांचे पौरोहित्य
या तीन दिवसीय महारुद्र अभिषेक पूजेसाठी वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, शुभम वैष्णव, प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, पवन शर्मा, यश जोशी, चंद्रकांत जोशी, तुषार दीक्षित, जयंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी यांच्यासह अयोध्या व प्रयागराज येथून खास निमंत्रित करण्यात आलेले गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल यांनी पौरोहित्य केले.
त्यांना उमेश पाठक, प्रवीण भंडारी व चेतन नाईक यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी सहकार्य केले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, उमाकांत हिरे, बाळा पचार, पुषंद ढाके आदींनी धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
आमदार अनिलदादांकडून टाळ वादनाची सेवा
महारुद्र अभिषेक पूजेच्या पूर्णाहुतीपूर्वी आमदार अनिलदादा पाटील काही वेळ ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडल’ स्थानी बसले. यावेळी वाद्यवृंदाच्या साथीने श्री मंगळग्रह देव व भगवान शंकर यांच्या स्तुतीपर भजनांचे गायन सुरू असताना आमदार अनिलदादांनी टाळ वादन करीत भक्तिभावाने साथसंगत केली.
आमदारांनी स्वतः टाळ वादन करून भक्तिमय वातावरणात सहभाग घेतल्याने उपस्थित भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. असंख्य भाविकांनी या स्तुतीपर भजनांचा व धार्मिक वातावरणाचा आत्मानंद घेतला.

Leave a Reply