कचेरी रोडवरील मातीच्या ढिगामुळे अपघातांची मालिका

एमएसईबीच्या कामानंतर रस्ता धोकादायक; प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कचेरी रोडवरील डिव्हायडर खोदून एमएसईबीमार्फत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, कामानंतर रस्त्यावर पडलेली माती व वाळू अद्याप हटविण्यात आलेली नसल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या मध्यभागी मातीचा ढीग तसाच पडून असल्याने दररोज पाच ते दहा लहान-मोठे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

कामानंतर रस्त्याच्या मध्यभागीच माती व साहित्याचा खच पडून राहिल्याने वाहनचालकांचा अचानक तोल जात आहे. विशेषतः दुचाकीस्वार घसरून जखमी होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढत असून नुकत्याच झालेल्या एका अपघातात जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली होती. मात्र, परिस्थिती अद्याप कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि एमएसईबी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील व्यापारी व नागरिकांनी केला आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहात का?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावर पडलेली माती व वाळू तात्काळ हटवून कचेरी रोड वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. तसेच डिव्हायडरचे काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स व सूचना फलक लावण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

“जीव वाचवणं हीच प्राथमिकता आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,” अशी मागणी कचेरी रोड परिसरातील व्यापारी व नागरिकांनी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *