
खडक्याच्या दोघी कन्यांचे एमपीएससीत दमदार यश ; क्लास वन-टू पदांवर निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खडके येथील भावलाल चुडामण पाटील यांच्या नाती तसेच नाशिक विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी वसंत मथुराबाई भावलाल पाटील यांच्या दोन्ही मुलींनी एमपीएससीत क्लास वन आणि क्लास टू पदांवर मजल मारली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रांजल योजना वसंत पाटील यांची 2024 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेत कृषी उपसंचालक (क्लास 1) पदावर निवड झाली आहे. तर त्यांची धाकटी बहीण मानसी योजना वसंत पाटील हिचीही महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 मधून मंडळ कृषी अधिकारी (क्लास 2) पदावर निवड झाली आहे. सलग दोन कन्यांनी मिळविलेल्या या यशामुळे खडके गावासह अमळनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलींनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. खडकेसह पंचक्रोशीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील, आमदार अनिल पाटील यांनी कौतुक केले. तसेच खडके (ता. अमळनेर) येथील ग्रामस्थ, बोदर्डे-वंजारी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, महाराणा प्रताप नगरमधील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार बांधवांकडूनही त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
दोन्ही बहिणींच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या युवक-युवतींना नवी दिशा मिळाली आहे.

Leave a Reply