बनावट मुद्रांक वापरून शासनाची फसवणूक; तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)  बनावट मुद्रांक खरा असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, १२ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अमळनेर तहसील कार्यालयात अव्वल कारकून अनिल परदेशी यांच्याकडे वीरेंद्र राजेंद्र सोनवणे (रा. गंगापुरी, ता. धरणगाव), कविता पंडित भिल (रा. सत्रासेन, ता. चोपडा) आणि राजेंद्र जगन्नाथ जोशी (रा. अमळगाव) हे अंतूर्लीकर विवाह मंडळाच्या विवाह सत्यतेसाठी १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र ऑनलाईन नोंदणी करून शिक्का व स्वाक्षरीसाठी आले होते. संबंधित प्रतिज्ञापत्र अनिल परदेशी यांनी प्रमाणित केले होते.

दरम्यान, २० एप्रिल २०२६ रोजी ॲड. अभिजित बिऱ्हाडे यांनी रंगीत झेरॉक्सच्या आधारे बेकायदेशीर प्रतिज्ञापत्र तयार केल्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नायब तहसीलदार ए. पी. कुलकर्णी यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीदरम्यान संबंधित तिघांना मूळ प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी मूळ मुद्रांकपत्र सादर केले नाही. तसेच कोणताही खुलासाही दिला नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल परदेशी यांना प्राधिकृत करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून वीरेंद्र राजेंद्र सोनवणे, कविता पंडित भिल आणि राजेंद्र जगन्नाथ जोशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ व ३४२ अन्वये अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *