
पारधीवाड्यात पोलिसांची धाड; घरातून तलवार जप्त, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सुभाष चौक परिसरातील पारधीवाडा भागात अमळनेर पोलिसांनी केलेल्या धाडीत एका घरातून तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई ५ जून रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आली असून या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, पारधीवाडा परिसरात राहणारा समाधान उर्फ दादू संतोष पाटील (मराठे) याने आपल्या घरात तलवार बाळगली आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक निकम यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. यानुसार पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, हेडकॉन्स्टेबल सुनील तेली, पोलिस कर्मचारी प्रशांत पाटील व मोनिका पाटील यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. मात्र, त्यावेळी समाधान उर्फ दादू पाटील घरी उपस्थित नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आईची परवानगी घेऊन घराची झडती घेतली.
झडतीदरम्यान घरात एक तलवार आढळून आली. पोलिसांनी तत्काळ ती जप्त करून पंचनामा केला. संबंधित व्यक्तीकडे तलवार बाळगण्यासंदर्भात कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पुढील कारवाई करण्यात आली. या प्रकरणी उज्वलकुमार म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समाधान उर्फ दादू संतोष पाटील (मराठे) याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करीत असून, जप्त करण्यात आलेली तलवार नेमकी कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आली होती, याचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच संबंधित व्यक्तीची चौकशी करून अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply