
वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन : प.पू. प्रसाद महाराज
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात१ जुलै रोजी रात्री ८ वाजता शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत सभामंडपाचे मोठे नुकसान झाले. मात्र, या संकटाच्या क्षणी धर्म, जात आणि राजकीय भेद विसरून हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडल्याची भावना प.पू. प्रसाद महाराज यांनी व्यक्त केली.
सध्या आषाढी वारीत असलेल्या प.पू. प्रसाद महाराजांनी भावनिक संदेशातून अमळनेरकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन दल, पोलीस अधिकारी, होमगार्ड, नगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाडी संस्थानचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, भक्तगण, संस्थेचे सेवेकरी तसेच हजारो नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले. अमळनेरसह पारोळा, चोपडा व शिरपूर येथील अग्निशमन दल तसेच खाजगी वाहनधारकांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांचेही प.पू. प्रसाद महाराजांनी कौतुक केले. या प्रसंगी दिसून आलेला सामाजिक एकोपा भविष्यातही कायम ठेवावा आणि कोणत्याही संकटाला सर्वांनी मिळून सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, भीषण आगीत सभामंडपाचे मोठे नुकसान झाले असले तरी गाभाऱ्यातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी याला ईश्वरी कृपा मानली आहे. “बरेच काही जळाले, पण देव शाबूत राहिले; यापेक्षा मोठी कृपा कोणती?” अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. आगीत मंदिराचे नुकसान झाले तरी प.पू. प्रसाद महाराजांनी आषाढी वारी अर्धवट सोडली नाही. “आधी पांडुरंग” ही भूमिका कायम ठेवत त्यांनी दिंडीचा प्रवास सुरूच ठेवला. यापूर्वी स्वतःच्या मातोश्रींच्या निधनाच्या प्रसंगीही त्यांनी वारी सोडली नव्हती. पांडुरंगाच्या भक्तीपुढे दुःख, मोह-माया आणि वैयक्तिक वेदना लहान ठरतात, अशी संतपरंपरेची शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा अधोरेखित केली.
आधी पांडुरंग’ या भावनेने माझी वारी सुरूच
“वाडी संस्थानला आग लागल्याचे कळताच अमळनेरकरांनी दाखविलेला एकोपा माझ्यासाठी मोठा आधार आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांनी हातात हात घालून जीवाची पर्वा न करता मंदिर वाचविण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधी, वाडी संस्थांचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, भक्तगण, संस्थांचे सर्व सेवेकरी आणि मदतीला धावून आलेल्या प्रत्येक नागरिकाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात, त्यामुळे मला कसलीही चिंता नाही. ‘आधी पांडुरंग’ या भावनेने माझी वारी सुरूच राहील. मंदिराची पुनर्बांधणीही आपल्या सर्वांच्या एकोप्याने नक्की उभी राहील.”
– प.पू. प्रसाद महाराज, गादीपुरुष, संत सखाराम महाराज वाडी संस्थान, अमळनेर.

Leave a Reply