तृतीयपंथीयांच्या स्वावलंबनासाठी अमळनेरात स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

शासकीय योजना, कर्ज सुविधा व व्यवसाय संधींची माहिती; आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढाकार

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय जळगाव तसेच तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना जिल्हास्तरीय समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथे तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात स्वयंरोजगार, व्यवसाय उभारणी, कर्ज योजना, आर्थिक सहाय्य, शासकीय दाखले, ओळखपत्रे तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तृतीयपंथीय बांधवांना स्वावलंबी बनवून सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी व शासकीय सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अधीक्षक निखिल महाजन, उद्योग विभागाचे उद्योग निरीक्षक एस. टी. लासुरकर, उमेद अभियानाच्या तालुका व्यवस्थापक सीमा रगडे, तालुका समन्वयक चेतन चौधरी, महेंद्र पाटील तसेच प्लॅन इंडिया संस्थेचे संकेत यांनी उपस्थित राहून तृतीयपंथीय बांधवांना विविध शासकीय योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, उमेद अभियान, महिला बचत गट आणि विविध आर्थिक विकास महामंडळांच्या प्रतिनिधींनीही लाभार्थींना योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले. त्यांनी तृतीयपंथीय व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देत या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवानी वाघ, ज्ञानेश्वर वाल्हे तसेच इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तृतीयपंथीय व्यक्तींना रोजगार, व्यवसाय आणि स्वावलंबनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सामाजिक समावेशकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. उपस्थित लाभार्थींनी अशा उपक्रमांचे स्वागत करत शासनाने भविष्यातही अशा मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नितीन भोई यांनी आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *