
धार्मिक वातावरणात संत नामदेवांच्या ‘चोवीस नामांचा महिमा’ पुस्तिकेचे अमळनेरात प्रकाशन
अमळनेर (प्रतिनिधी) धार्मिक कार्याच्या प्रारंभी श्रीविष्णूंच्या पवित्र केशव नामावलीचे श्रद्धेने उच्चारण करण्याची परंपरा असून, या नामावलीमुळे चंचल मनाला स्थैर्य, शांती व एकाग्रता लाभते, असे मानले जाते. या पवित्र नामावलीच्या महत्त्वावर आधारित संत नामदेवांच्या अभंगरचनेचा ‘चोवीस नामांचा महिमा’ या नावाने प्रथमच पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशन करण्यात आले.
संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांनी संत नामदेवांच्या अभंगांचा भावार्थ व केशव नामावलीचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करत या पुस्तिकेचे संपादन केले आहे. पुणे येथील धार्मिक प्रकाशन संस्थेने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी आमदार अनिल पाटील, नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर, माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ. अनिल शिंदे, पोलीस अधीक्षक तसेच प्रशासकीय अधिकारी व संत सखाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यात्रोत्सवाच्या निमित्त आयोजित अक्षयतृतीया स्तंभारोपण कार्यक्रमात हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात अनेक मान्यवर व हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुस्तिकेचे संपादक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दरम्यान, ‘चोवीस नामांचा महिमा’ या पुस्तिकेची किंमत ६० रुपये असून ती संस्थानाच्या ग्रंथभांडारात उपलब्ध आहे. तसेच इच्छुकांनी ९९२२२४९५९९ या क्रमांकावर संपर्क साधूनही पुस्तिका प्राप्त करू शकतात.

Leave a Reply