
अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून उसळला संताप; नगरपरिषदेला ४८ तासांचा अल्टिमेटम, आंदोलनाचाही दिला इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून अमळनेर नगरपरिषद प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. “दोन दिवसाआड पाणीपुरवठा” करण्याचा दावा प्रत्यक्षात पूर्णपणे कोलमडला असून अनेक भागांमध्ये नागरिकांना तब्बल ७ ते ८ दिवसांनी पाणी मिळत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, पाणी हा जीवनावश्यक घटक असून त्याचा नियमित पुरवठा करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणीपुरवठा होत नसतानाही नागरिकांकडून पाणीपट्टीची सक्तीने वसुली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय थकबाकीच्या कारणावरून नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाया केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, आगामी संत सखाराम महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न ठेवल्यास सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी प्रशासनासमोर ४८ तासांत नियमित पाणीपुरवठा सुरू करणे, अधिकृत वेळापत्रक जाहीर करणे, टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणे, पाणीपट्टी वसुली तात्पुरती थांबवणे तसेच नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाया स्थगित करणे अशा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या मागण्या निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. “पाणी हा आमचा हक्क आहे, भीक नाही! सेवा द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा!” अशी ठाम भूमिका नागरिकांनी व्यक्त केली. निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, सनी गायकवाड, मनिष देसले, चेतन पाटील आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply