बेमुदत संपात अमळनेर महसूल कर्मचारी संघटना सहभागी; तहसील आवारात निदर्शने व घोषणाबाजी

अमळनेर (प्रतिनिधी) विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेने सक्रिय सहभाग नोंदविला. संपाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने व घोषणाबाजी केली.

महसूल कर्मचारी संघटना ही राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेशी संलग्न असल्याने सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकदिलाने संपात सहभागी होत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयीन कामकाजावरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. या संपामागील प्रमुख मागण्यांमध्ये सन २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत सविस्तर अधिसूचना तात्काळ जाहीर करणे यांचा समावेश आहे. याशिवाय इतर विविध प्रशासकीय व आर्थिक मागण्यांसाठीही आंदोलन छेडण्यात आले आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले की, “शासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” या आंदोलनात उपाध्यक्ष रुपाली अडकमोल, सरचिटणीस मुकेश काटे यांच्यासह संघटनेचे असंख्य सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *