अपयशाला न जुमानता पाच वर्षांची जिद्द फळाला; निंभोऱ्याचा शेतकरीपुत्र बनला सीबीआय इन्स्पेक्टर!

अमळनेर (प्रतिनिधी) निंभोऱ्यासारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या निरंजन सुनील पाटील याने अथक परिश्रम, जिद्द आणि अपयशावर मात करत केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) इन्स्पेक्टरपदी निवड होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

आजकाल अनेक तरुण अपयश आले की परिस्थितीला दोष देत निराश होतात; मात्र निरंजन सुनील पाटील याने अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने प्रयत्न सुरू ठेवत यशाला गवसणी घातली आहे. त्याने साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण प्रताप कॉलेज, अमळनेर येथे पूर्ण केले. त्यानंतर इतिहास विषयातून ओपन युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. तब्बल पाच वर्षे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना त्याला अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी मुलाखतीपर्यंत मजल मारूनही अंतिम निवड हुकत होती. सीडीएसई, सीएपीएफ असिस्टंट कमांडर पदासाठी दोन वेळा तसेच कॅबिनेट सचिवालयाच्या मुलाखतीसाठी तो पात्र ठरला होता; मात्र अंतिम निवड होऊ शकली नाही. तरीही निरंजनने हार मानली नाही. अपयशातून शिकत त्याने सातत्याने अभ्यास आणि मेहनत सुरू ठेवली.

निंभोऱ्यातील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही स्वतःच्या जिद्दीवर आणि मेहनतीवर निरंजन सुनील पाटील याने आपले ध्येय साध्य केले. अखेर काही दिवसांपूर्वी त्याची सीबीआय इन्स्पेक्टरपदी निवड झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निरंजन सुनील पाटील याने आपल्या प्रवासातील अपयशाचे अनुभव मोकळेपणाने सांगितले. अभ्यासाची पद्धत, नवीन तंत्रांचा वापर आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसंदर्भातील विविध टिप्स त्याने विद्यार्थ्यांना दिल्या. स्वतःचा प्रेरणादायी प्रवास कथन करताना अपयश आले तरी खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश त्याने विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते.  अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सचिव संदीप घोरपडे यांनी सांगितले की, “कोणत्याही अधिकाऱ्याने सेवा करत असताना जर का सचोटी सोडली नाही तर एक चांगला अधिकारी निर्माण होऊ शकतो. आपल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांमध्ये मी एक चांगला अधिकारी बघतो.” प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी सांगितले की, “एक अधिकारी सर्व सिस्टीम बदलू शकतो. चांगल्या माणसाचे नाव आणि कार्य अजरामर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले कामे करावी.” निरंजन सुनील पाटील याच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी केले, तर आभार देवेंद्र पाटील यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *