अमळनेर तालुक्यात ५ ऑक्टोबरला महसूल लोक अदालत; प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढणार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या अर्धन्यायीक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली महसुली दावे व अपिले तडजोडीने निकाली काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन ५ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे. या अभियानात दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने प्रकरणांचा कायमस्वरूपी निपटारा करून जलद न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यभर महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. महसूल प्रशासनातील विविध अर्धन्यायीक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या महसुली दावे व अपिले तडजोडीने आणि परस्पर संमतीने निकाली काढणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. अमळनेर तालुक्यातील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या अर्धन्यायीक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा आणि अपिलांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणांचा कायमस्वरूपी निपटारा झाल्याने पक्षकारांना जलद न्याय मिळण्यास मदत होणार असून महसूल प्रशासनावरील प्रलंबित प्रकरणांचा ताणही कमी होणार आहे. प्रलंबित महसुली दावा असलेल्या दोन्ही पक्षकारांनी अथवा त्यांच्या वकिलांमार्फत शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र-अ मधील नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज संबंधित अर्धन्यायीक न्यायालयात सादर करावा. लोक अदालतीच्या निश्चित दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने संबंधित प्रकरणावर अंतिम आदेश पारित करून ते कायमस्वरूपी निकाली काढण्यात येणार आहे.

अमळनेर तालुक्यातील महसुली अर्धन्यायीक प्रकरणे सुरू असलेल्या सर्व पक्षकारांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग घेऊन तडजोडीसाठी अर्ज सादर करावा आणि आपले प्रलंबित अर्धन्यायीक प्रकरण निकाली काढण्याबाबतची कार्यवाही करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *