
शिव टेकडीच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार अनिल पाटील यांची १ लाखांची मदत
अमळनेर (प्रतिनिधी) धार ते शिव टेकडीपर्यंत पाणीपुरवठा वाहिनी टाकण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी १ लाख रुपयांची मदत केली आहे. या पाईपलाईनमुळे शिव टेकडीवर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, या निसर्गरम्य पर्यटनस्थळाच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
शिव टेकडी हे अमळनेर तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. सकाळ-संध्याकाळ मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकसाठी शेकडो नागरिक, तसेच परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडही सुरू झाली आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने धार ते शिव टेकडीपर्यंत पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ धार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. माजी नगरसेवक तथा कुस्ती-मल्लविद्या तालुकाप्रमुख प्रताप शिंपी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला. संपूर्ण टेकडीला ‘शिव टेकडी’ हे नाव प्रताप शिंपी यांनीच दिले असून, टेकडीच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर शिव टेकडीवर येणाऱ्या नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर होणार आहे. त्याचबरोबर या परिसरातील पर्यटन विकासालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे. या कामासाठी १ लाख रुपयांची मदत केल्याबद्दल धार ग्रामस्थ आणि शिव टेकडीप्रेमींच्या वतीने आमदार अनिल पाटील यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply