चांदणी कुर्हे येथील रेल्वे बोगदा रस्ता दुरुस्तीसाठी ४५ दिवस राहणार बंद

अवजड वाहनांची वाहतूक ढेकू-सारबेटा मार्गाने वळवली

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदणी कुऱ्हे-धरणगाव मार्गावरील सती माता मंदिराजवळ असलेला रेल्वे बोगदा क्रमांक ३७ हा रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल ४५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक तात्पुरती वळविण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर-धरणगाव रस्त्यावरील चांदणी कुऱ्हे जवळील सती माता मंदिर परिसरातील रेल्वे बोगदा क्रमांक ३७ येथे रस्त्याची दुरुस्ती व आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. या कामामुळे संबंधित मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे दिनांक ९ मार्च ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत एकूण ४५ दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनिअर पंकज पी. हादेकर यांनी दिनांक ४ मार्च २०२६ रोजी अमळनेर तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर एसटी आगार प्रमुख, चांदणी कुर्हे येथील सरपंच, रेल्वे सुरक्षा बल अमळनेर, मंडल अभियंता तसेच रेल्वेचे सेक्शन इंजिनिअर अमळनेर यांना पत्र देऊन या निर्णयाची माहिती दिली आहे. या पत्रानुसार, रस्ता बंद असताना अवजड वाहनांची वाहतूक ढेकू-सारबेटा या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तर केवळ लहान वाहनांसाठी पूल क्रमांक ३२५ च्या खालून जाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनचालकांनी वाहतूक सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच कामाच्या काळात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *