
लग्नसोहळ्यात वृक्षारोपणातून नवदांपत्याचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
प्रगणे डांगरी येथे विवाहापूर्वी बेलाच्या वृक्षाची लागवड; सर्वत्र कौतुक

अमळनेर(प्रतिनिधी )तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे एका नवदांपत्याने आपल्या विवाहसोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम राबविला. चि. वैभव शिसोदे आणि चि. सौ. का. कल्याणी मोरे यांच्या शुभविवाहानिमित्त ६ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्रगणे डांगरी येथे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लग्न विधीपूर्वी नवदांपत्याने स्वतःच्या हस्ते बेलाच्या वृक्षाची लागवड करून पर्यावरण जतनाचा संदेश दिला. वृक्षारोपण ही काळाची गरज असून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या उपक्रमामुळे उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, नवरदेव वैभव शिसोदे यांनी गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे.
सध्या वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचे असंतुलन रोखण्यासाठी शासन विविध अभियान राबवत असताना विवाहासारख्या मंगल प्रसंगी समाजासमोर आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. विवाहाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र येत असल्याने नवदांपत्याने दिलेला हा संदेश अधिक प्रभावी ठरला.
यावेळी तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील, सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील तसेच गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply