खासगी व्हिडीओ व्हायरल करणे हा फक्त गुन्हा नाही… एका आयुष्याची हत्या आहे!

अमळनेर (प्रतिनिधी )आज सोशल मीडियावर एका युवतीचा खासगी अवस्थेतील व्हिडीओ काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी व्हायरल केला… आणि पुन्हा एकदा माणुसकी हरल्याचं चित्र समोर आलं.

तो व्हिडीओ फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी तो फक्त “कंटेंट” असेल…पण त्या मुलीसाठी? तो तिच्या आयुष्याचा सर्वात भयानक क्षण आहे…तिचा आत्मविश्वास, तिचं मानसिक स्वास्थ्य, तिचं समाजात जगणं — सगळं एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं. एका मुलीची चूक असो वा नसो…तिची खासगीता तिचा अधिकार आहे. तिच्या परवानगीशिवाय तिचा फोटो, व्हिडीओ शेअर करणे म्हणजे तिच्यावर मानसिक अत्याचार करण्यासारखे आहे.

 

 हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे

 

माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कुणाचाही खासगी व्हिडीओ/फोटो परवानगीशिवाय शेअर करणे, सेव्ह करणे किंवा फॉरवर्ड करणे हा गंभीर सायबर गुन्हा आहे. दोषींना ३ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

 

एक “फॉरवर्ड” कुणाचा जीव घेऊ शकतो…

 

आपण मजा म्हणून, उत्सुकतेपोटी किंवा ग्रुपमध्ये चर्चेसाठी असे व्हिडीओ शेअर करतो… पण त्या मागे एक जिवंत व्यक्ती असते, तिचं कुटुंब असतं, तिची स्वप्नं असतात. बदनामीच्या भीतीने अनेक पीडित व्यक्ती नैराश्यात जातात… काही जण टोकाचं पाऊलही उचलतात.

 

 म्हणून विनंती आहे…

 

• असा कोणताही व्हिडीओ तुमच्याकडे आला तर तात्काळ डिलीट करा.

• तो पुढे फॉरवर्ड करू नका.

• पीडितेला दोष देऊ नका, तिच्या पाठीशी उभे रहा.

• व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या.

• सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी : 1930

•  पोलिस प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करावी.

कारण अशा विकृत प्रवृत्तींना वेळीच आळा बसला नाही तर उद्या कोणत्याही मुलीची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

आज ती युवती आहे…

 

उद्या आपल्या घरातील बहीण, मुलगी, पत्नी किंवा मैत्रीणही असू शकते…म्हणून तमाशा पाहणारे बनू नका…माणूस बना…माणुसकी जपा.

– एक अमळनेरकर जागरूक नागरिक

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *