
नव्या मालमत्तांच्या घरपट्टीविरोधात अमळनेरात २० सप्टेंबरला नागरिकांची बैठक
अमळनेर (प्रतिनिधी) नगररचना विभागामार्फत अमळनेर नगरपरिषदेने नव्या मालमत्तांना लावलेल्या घरपट्टीच्या विरोधात नागरिकांची बैठक रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, पोस्ट ऑफिसच्या बाजूला आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नव्या मालमत्तांच्या घरपट्टीबाबत चर्चा, मार्गदर्शन आणि विचारविनिमय करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
दि. १५ आणि १६ सप्टेंबर रोजी नगररचना विभागामार्फत नव्या मालमत्तांना लावण्यात आलेल्या घरपट्टीबाबत सुनावणी पार पडली. या पार्श्वभूमीवर कोअर प्रोजेक्ट कंपनी, अमरावती यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मालमत्तांच्या मोजमाप व कर आकारणीबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे आवाहनात नमूद करण्यात आले आहे. खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने मोजमाप घेऊन अवाजवी कर आकारणी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घरपट्टी कमी अथवा रद्द होण्याची शक्यता कमी असल्याने नागरिकांना या प्रश्नासाठी एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचे आवाहनात म्हटले आहे. त्यासाठी पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस अमळनेर नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, अशी विनंती सोमचंद संदानशिव यांनी केली आहे.

Leave a Reply