
राखीतून जपला प्रेमाचा धागा; नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा उत्साह
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा सण उत्साह, आनंद आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये परस्परांविषयी प्रेम, आदर, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शाळेच्या पटांगणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक अतुल भोई यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात ‘राखी बंधनाचा सण’ हे गीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. याप्रसंगी शाळेत ‘राखी बनवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक आणि रंगीबेरंगी राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना या उपक्रमातून वाव मिळाला.
यानंतर रक्षाबंधनाच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी आपल्या वर्गमित्रांना आणि शिक्षकांना ओवाळून त्यांच्या मनगटावर राखी बांधली. विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना ओवाळणी देत त्यांच्या रक्षणाचे आणि नेहमी पाठीशी राहण्याचे वचन दिले. विद्यार्थ्यांनी एकमेकांचे तोंड गोड करून रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला. मुख्याध्यापक अतुल भोई यांनी रक्षाबंधनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सांगत या सणाचे महत्त्व स्पष्ट केले. “हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून समाजात एकमेकांबद्दल आदर आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा संदेश देतो,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमातील विशेष उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या काही राख्या आणि शुभेच्छापत्रे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांसाठी तसेच मतिमंद शाळेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव आणि देशसेवेची भावना प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गायनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply