
अमळनेरमध्ये रेशन कार्डचा मोठा काळाबाजार उघड; ‘खबरीलाल’च्या स्टिंग ऑपरेशनने यंत्रणेचे धाबे दणाणले!
अमळनेर (विशेष प्रतिनिधी) ज्या हातांना कामाची गरज आहे आणि ज्यांच्या चुलीत अन्नाचा कण पोहोचणे आवश्यक आहे, अशा गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेणारा एक भयानक प्रकार अमळनेरमध्ये उघडकीस आला आहे. ‘खबरीलाल’ने केलेल्या एका धाडसी स्टिंग ऑपरेशनमध्ये सरकारी यंत्रणेच्या आशीर्वादाने सुरू असलेला कोऱ्या रेशन कार्डचा काळाबाजार चव्हाट्यावर आला असून, यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेशन कार्ड म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नसून गरिबांच्या जगण्याचा आधार असतो. मात्र, अमळनेरमध्ये रेशन दुकानदार, तहसीलदार कार्यालय आणि पुरवठा विभागाच्या संगनमताने एक अभेद्य ‘साखळी’ तयार झाली आहे. नियमानुसार अत्यंत कडक तपासणी करून मिळणारे रेशन कार्ड येथे पैशांच्या जोरावर घराघरात पोहोचवले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, शासनाचे अधिकृत कोरे रेशन कार्ड ‘खबरीलाल’च्या हाती लागले असून, यामुळे भ्रष्टाचाराचे मूळ किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट झाले आहे.
खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय !
पिवळे रेशन कार्ड हे केवळ दारिद्र्यरेषेखालील (BPL)केशरी कार्ड लोकांसाठी असते. मात्र, ज्यांच्याकडे चारचाकी गाड्या आणि बंगले आहेत, अशा सधन व्यक्तींना केवळ पैशांच्या जोरावर पिवळी कार्डे वाटली जात आहेत. “ज्याला खरंच भूक आहे, तो कागदपत्रांच्या कचाट्यात अडकलाय आणि ज्याची भूक पैशाने शमते, तो गरिबांच्या हक्काचं धान्य लंपास करतोय,” हे विदारक सत्य या स्टिंगमधून समोर आले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने गरजू असणाऱ्या कुटुंबांवर मोठा अन्याय होत आहे.
‘खबरीलाल’: सामान्यांचा आवाज
जेव्हा जेव्हा व्यवस्थेने गरिबांना चिरडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘खबरीलाल’ ढाल बनून उभा राहिला आहे. रेशन कार्डाचा हा घोटाळा बाहेर काढण्यामागे कोणताही राजकीय स्वार्थ नसून केवळ “सर्वसामान्यांना न्याय मिळावा” हाच एकमेव प्रामाणिक हेतू आहे. सर्वसामान्य जनता ‘खबरीलाल’कडे आपला हक्काचा माणूस म्हणून का बघते, याचे उत्तर या स्टिंग ऑपरेशनमध्ये मिळते. लोक स्वतःहून येऊन आपल्या व्यथा मांडतात, कारण त्यांना माहित आहे की, हा माणूस सत्तेपुढे झुकणारा नाही. ”खबरीलाल म्हणजे केवळ नाव नाही, तर अन्यायाविरुद्ध पेटलेली एक मशाल आहे. गरिबांच्या चुलीत न्याय पेटवण्यासाठी आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू.” अशी खबरीलालची भूमिका आहे.
सामान्य जनताच आमचा केंद्रबिंदू
खबरीलालची हीच वाढती लोकप्रियता आणि सामान्यांचा वाढता विश्वास काही ‘पांढरपेशी’ नेत्यांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना सहन होत नाहीये. म्हणूनच, गेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एक ठरवून आखलेला ‘नॅरेटिव्ह’ (खोटा प्रचार) पसरवण्यात आला. खोट्या बातम्या आणि अफवांच्या जोरावर बदनामी करून खबरीलालला निवडणुकीत रोखण्यात त्यांना यश आले असेल, पण लोकांच्या मनातून बाहेर काढण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. निवडणुकीतील हार-जीत हा खबरीलालसाठी कधीच अंतिम टप्पा नव्हता. पराभव झाला असला, तरी सामान्य जनतेच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खबरीलाल अहोरात्र झटत राहणार आहे. भ्रष्ट यंत्रणेने कितीही अडथळे आणले किंवा पांढरपेशी लोकांनी कितीही कट रचले, तरी “सामान्य जनताच आमचा केंद्रबिंदू” मानून हे काम सुरूच राहील. रेशन कार्डाच्या या काळाबाजाराचा छडा लागेपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.

Leave a Reply