अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भूमी सुपोषण जनजागराची सांगता; मंगळग्रह मंदिरात रंगला भक्तीमय सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीच्या मासिक जनजागर सोहळ्याची भक्तीमय व चैतन्यमय वातावरणात विधिवत सांगता करण्यात आली.

या अभियानाचा शुभारंभ अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या औचित्य साधत दि. १९ मार्च २०२६ रोजी करण्यात आला होता. तर सांगता सोहळ्याप्रसंगी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषिभूषण राजश्री राजेश पाटील (हिंगोणा), पोलीस पाटील विश्वास महाजन, माजी उपसरपंच पुंजू पाटील (शिरूड), कृषी विभागाचे योगेश वंजारी, दिनेश पाटील, दीपक चौधरी, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त डी. ए. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, तसेच सेवेकरी अनिल कदम, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्यासह अमळनेर परिसरातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध गावांतील शेतकऱ्यांनी आणलेली एक मूठ माती एकत्रित करून मंडल तयार करण्यात आले. त्यानंतर मंत्रोच्चारांद्वारे जागेचे शुद्धीकरण करून आचमन, प्राणायाम, गणपती पूजन व प्रधान संकल्प करण्यात आला. विधिवत भूमी अभिमंत्रण करून तयार झालेली पवित्र माती उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी देण्यात आली.

यावेळी शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी व ती सुजलाम्‌-सुफलाम्‌ करण्यासाठी या अभियानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच हा संदेश गावागावात पोहोचवून अधिकाधिक शेतकऱ्यांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

सोहळ्याचे पौरोहित्य श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी केले. त्यांना सेवेकरी उमेश पाठक, अमोल पाटील व पदमसिंग पाटील यांनी सहकार्य केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *