
जनगणना २०२७ साठी अमळनेरात दोन टप्प्यांत प्रशिक्षणाचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) भारत सरकारच्या जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रगणक (इन्यूमरेटर), पर्यवेक्षक (सुपरवायझर) तसेच राखीव कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत पार पडणार असून दि. २३ ते २५ एप्रिल तसेच दि. २७ ते २९ एप्रिल या कालावधीत अमळनेर येथील ग्लोबल व्ह्यू स्कूलमध्ये सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत सत्रे आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सांगितले की, जनगणना अधिनियम १९४८ व जनगणना नियम १९९० तसेच भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्या निर्देशांनुसार हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. संबंधित सर्व नियुक्त प्रगणक, पर्यवेक्षक व राखीव कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणास अनिवार्य उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणतीही गैरहजेरी सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठीचे नियुक्ती आदेश तात्काळ संबंधितांना देऊन त्याची पोहोच उलटटपाली सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशिक्षणादरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांसाठी दोन वेळा चहा तसेच दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. जनगणना २०२७ ची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून तालुक्यातील सर्व संबंधित यंत्रणा सज्ज करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली आहे.

Leave a Reply