
श्री मंगळग्रह मंदिरातून संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी
अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने शनिवारी दि. २५ जुलै रोजी संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात निघालेल्या दिंडीने संपूर्ण अमळनेर परिसर भक्तिमय झाला. वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दिंडीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राजदंडाचे पूजन केले, भगव्या पताकेला वंदन केले आणि दिंडीला खांदा दिला. यावेळी त्यांनी हातात टाळ घेऊन काही काळ दिंडीत सहभागी होत विठ्ठलनामाचा गजरही केला. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याचे महत्त्व अधिकच वाढले.
यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल प्रशासनातील पुरुषोत्तम पाटील व टी. सी. धनराळे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार, मंदिराचे सेवेकरी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी श्री मंगळग्रह मंदिरात सपत्नीक पूजा-अर्चा करून संकल्प सोडला. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने डॉ. डिगंबर महाले यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री मंगळग्रह देवतेची विधिवत पूजा, अभिषेक आणि महाआरती झाल्यानंतर वैष्णव परंपरेचे प्रतीक असलेल्या पताका, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठलाच्या प्रतिमेसह दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरेल संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत दिंडीत सहभाग घेतला.
दिंडीदरम्यान संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सामूहिक गायन करण्यात आले. ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या नामघोषांनी संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला. समता, सेवा, प्रेम, संयम आणि ईश्वरनिष्ठेचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेचे दर्शन या सोहळ्यात घडले.
दिंडी मार्गावरील पैलाड परिसर आणि चोपडा नाका येथे भाविकांनी पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले. दगडी दरवाजा ते सराफ बाजार मार्गे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत हरिपाठ, भजन आणि फुगडीचा आनंद लुटण्यात आला. वाडी संस्थानात विश्वस्त तथा पुरोहित जय देव आणि सेवेकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे राजदंडाचा स्पर्श करून हरिपाठ, महाआरती व विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आणि दिंडी पुन्हा श्री मंगळग्रह मंदिरात परतली.
आषाढी एकादशीच्या या सोहळ्याने भक्ती, श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. श्री मंगळग्रह मंदिरातून निघालेली ही दिंडी केवळ वाडी संस्थानापर्यंतचा प्रवास न राहता, संतपरंपरेचा गौरव करणारी आणि प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणातील विठ्ठलभक्ती जागविणारी मंगल यात्रा ठरली.
श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमळनेर व परिसरातील भाविकांनी रिमझिम पावसातही श्री मंगळग्रह देवतेच्या दर्शनासाठी सकाळपासून मोठी गर्दी केली. अनेक भाविकांनी काही काळ दिंडीत सहभागी होत विठ्ठलनामाचा गजर केला. मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने दिवसभर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. दिवसभर भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने नटला असून अध्यात्माचा मंगल सुगंध सर्वत्र दरवळत असल्याची अनुभूती भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Reply