
सडावण चाकवे शिवारातून सहा जनावरे चोरीला, दोन शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजारांचे नुकसान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सडावण येथील चाकवे शिवारात अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या एकूण सहा जनावरांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये सुमारे ४० हजार रुपये किमतीची जनावरे लंपास करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्रताप श्रीकृष्ण पाटील, रा. सडावण यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, त्यांच्या चाकवे शिवारातील गट क्रमांक १६९ मधील शेतातून सुमारे सहा हजार रुपये किमतीची एक गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच त्याच परिसरातील गट क्रमांक ६८ मधील शेतात बांधून ठेवलेली संदीप पाटील यांच्या मालकीची दोन बैल व तीन गायी, अशी एकूण पाच जनावरेही चोरट्यांनी पळवून नेली. या जनावरांची किंमत सुमारे ३४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही घटना ५ मे रोजी रात्रीपासून ६ मे रोजी सकाळदरम्यान घडली. ६ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास शेतकऱ्यांना जनावरे आढळून न आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने करीत आहेत.

Leave a Reply