पोलिसांनी गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारे वाहन पकडले; ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) अवैधरीत्या गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर पोलिसांनी कारवाई करत ४ लाख २० हजार रुपयांचे वाहन व गुरे जमा केली आहेत. याप्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून चालकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चरणदास जगन पाटील हे गस्तीवर असताना २८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरी नदी फरशी पुलावर मारुती मंदिराजवळ एम. एच. १९ सी. एक्स. २५४४ क्रमांकाचे मालवाहू वाहन दोन गुरांना दाटीवाटीने कोंबून नेताना आढळून आले. चालकाचे नाव विचारले असता त्याने रोहित प्रमोद पाटील (रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे सांगितले. त्याच्याकडे गुरांच्या वाहतुकीचा परवाना विचारला असता तो नसल्याचे आढळून आले. तसेच गुरांना दाटीवाटीने कोंबून निर्दयीपणे व क्रूरतेची वागणूक देऊन वाहतूक केली जात असल्याने पोलिसांनी रोहित प्रमोद पाटील याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)(ड)(ई)(फ)(क), भारतीय न्यायसंहिता कलम ३(५) व मुंबई पोलीस कायदा कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी चार लाख रुपयांचे वाहन व २० हजार रुपयांची गुरे जमा केली असून गुरांना गोशाळेत रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल उदय बोरसे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *