
अंबऋषी टेकडीवर ५० झाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
अमळनेर ( प्रतिनिधी ): शहरातील अंबऋषी टेकडी परिसरात अंबऋषी टेकडी बहुउद्देशीय पर्यावरण ट्रस्टच्या वतीने शनिवारी (दि. ४ जुलै) पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत टेकडी परिसरात सुमारे ५० विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण मोहिमेत ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य, महिला पदाधिकारी, नगरपरिषदेचे सदस्य, नगरसेवक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले.
अंबऋषी टेकडी बहुउद्देशीय पर्यावरण ट्रस्ट गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असून, अंबऋषी टेकडी हिरवागार करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण, रोपांचे संगोपन आणि जनजागृतीच्या माध्यमातून ट्रस्ट पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक व्यापक करत आहे.
यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वृक्षारोपणासह लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply