
पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न; पती, जेठाणी व तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) पत्नीला दारू पाजून, भांग खाऊ घालून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी पती, जेठाणी आणि एका अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ जुलै रोजी तांबेपुरा परिसरात घडल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिजा फिरोज पिंजारी (रा. तांबेपुरा, नंदगाव रस्ता, अमळनेर) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, १ जुलै रोजी दुपारी तब्येत ठीक नसताना त्यांचे पती फिरोज रहेमतुल्ला पिंजारी घरी आले. त्यांनी एका बाटलीत ओआरएसची पावडर टाकल्याचे सांगून ते पाणी पिण्यास दिले. मात्र त्यामध्ये दारू असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पिण्यास नकार दिला. त्यानंतर पतीने उरलेली दारू स्वतः प्यायली. फिर्यादीनुसार, सायंकाळी पतीने हिरव्या रंगाची भांगची गोळी जबरदस्तीने तोंडात कोंबून पाणी पाजले. नशा चढू लागल्यानंतर त्याने एका अनोळखी मित्राला घराच्या मागील दरवाजाने बोलावून घेत पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पीडित महिला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पतीने तिचे केस ओढून वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच माहेरून पैसे आणण्यासही सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
यानंतर पती फिरोज रहेमतुल्ला पिंजारी, जेठाणी तबस्सुम तन्वीर पिंजारी आणि अनोळखी तरुण यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर महिला घराबाहेर पळून जाऊन अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७९, ११५ (२), ३५१ (२) आणि ३५२ अन्वये पती, जेठाणी व अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

Leave a Reply