
पिळोद्यात दुकानाच्या मालकीवरून दोन गटांत हाणामारी; परस्परविरुद्ध गुन्हे दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिळोदा येथे दुकानाच्या मालकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना ११ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत चौकात घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत लतीफ इमाम खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते आपले खाटीकचे दुकान बंद करत असताना समदशहा दगाशहा फकीर हा दुकानाजवळ आला व “हे दुकान माझे आहे” असे म्हणत दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकू लागला. त्याला मनाई केली असता रजाकशहा दगाशहा फकीर, जाकीर दगाशहा फकीर, दगाशहा कदीरशहा फकीर व सलीम फकीर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा नवाज लतीफ खाटीक हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ११५ (२), १८९ (२), ३२४ (२), ३५२ व ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या गटाकडून शाहरुख समदशहा फकीर यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ११ रोजी रात्री त्यांच्या आजोबा दगुशहा कादर्शहा फकीर यांना लतीफ इमाम खाटीक मारहाण करीत होते. त्यावेळी ते मोबाईलमध्ये छायाचित्र काढत होते. हे पाहून शहानवाज उर्फ गुड्डू लतीफ खाटीक याला राग आला. “तुझ्या वडिलांनी माहितीचा अधिकार टाकला आहे, तुम्हाला मारून टाकू,” अशी धमकी देत त्याने लोखंडी रॉडने त्यांच्या डाव्या हातावर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ते खाली पडल्यावर लतीफ खाटीक यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी काका अरमानशहा दगुशहा फकीर आले असता त्यांच्या कपाळावरही लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचे नमूद आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ व ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

Leave a Reply